अध्यक्षीय मनोगत
सस्नेह सादर नमस्कार! श्री गुरुकुलम् न्यासाची संस्थापक अध्यक्षा मंजिरीताई फडके आपल्याशी संवाद करीत आहेत. संक्षेपाने व्यक्तीगत ओळख तसेच श्री गुरुकुलम् न्यास संस्था स्थापनेची पूर्वपिठीका
आई आशालता आणि वडील मोरेश्वर यांच्या कडून वाचन, लेखन, वक्तृत्व, अनुशासन यांसह सामाजिक सर्वसमावेशकतेचा समृद्ध वारसा प्राप्त झाला. सासरी आल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राष्ट्र सेविका समिती या संघटनाशी घट्ट नाळ जोडली गेली. जीवनसमृद्धीसाठी विविध पैलूंचा व्यक्तीमत्व जडणघडणीत विकास होत राहिला. शालेय विश्वातील हुजूरपागेच्या शिक्षकांकडून निरलसपणे दिलेले ध्येयसमर्पित योगदान कोरले गेले. पुढे कॉलेजविश्वातून उत्तम यश संपादून एका प्रथितयश संस्थेमध्ये अध्यापक म्हणून सेवा करण्याची संधी मिळाली. २५ वर्षे कार्यरत असतानाच वनवासी कल्याण आश्रम या संघ परिवारातील संघटनेची पूर्ण वेळ प्रचारक म्हणून बिनपगारी रजा घेऊन सेवा कार्य करता आले. भारताच्या एका वेगळ्याच दूरदराज क्षेत्रात, संस्कृतीची पताका अखंड उंचावत ठेवत, परिस्थितीशी झगडत समाधानी वृत्तीने जीवन कसे जगावे याचा वस्तुपाठ मिळाला. भौतिक विकासाची आस असली तरी वाट सापडत नव्हती त्यांना!