दृष्टिक्षेपात श्रीगुरुकुलम् न्यास
( संक्षिप्त )

श्रीगुरुकुलम् न्यास ही संस्था २०१३ सालापासून भारतीय संस्कृतीचे संवर्धन , प्रचार व प्रसाराचे कार्य श्रीमद्भगवद्गीता या सर्वकालीन ग्रंथाच्या माध्यमातून करीत आहे . संस्थेने कार्यविस्तारासाठी श्रीमद्भगवद्गीतेतील पंचसूत्रीला ( संकल्प , संयोजन-संस्करण , समन्वय , सिद्धी , समर्पण ) आधारभूत मानले आहे . रायगड , ठाणे , नाशिक , मुंबई आणि पालघर या पाच जिल्ह्यांमध्ये श्रीगुरुकुलम् न्यास आपल्या चाळीस शिक्षकांच्या माध्यमातून कार्यरत आहे . व्यक्तीच्या शारीरिक , मानसिक व बौद्धिक विकासासाठी भगवद्गीता अभ्यासणे आवश्यक आहे याची जाणीव प्रत्यक्ष समाजामध्ये मिसळून , संथा वर्ग , सखोल अभ्यासक्रम व शालेय प्रकल्प या विविध आयामांमार्फत नि:शुल्क पद्धतीने जागवीत आहे . श्रीगुरुकुलम् न्यासाचे महत्वाचे प्रकल्प आपल्या निदर्शनास आणू इच्छित आहोत .


(1) अमृतस्पर्शी भगवद्गीता प्रश्नमंजुषा स्पर्धा :-
भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायाचे मर्म सांगणारे १८ परिच्छेद न्यासाच्या शिक्षकांनी मिळून तयार केले आहेत . त्यावर आधारित प्रत्येकी दहा वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत . या प्रश्नांची उत्तरे स्मरणशक्ती चाचणीप्रमाणे परिच्छेद दूर ठेवून सहभागींनी द्यायची असतात . त्यानुसार प्रत्येक सहभागीला भांडुप श्रीगुरुकुलम् न्यासाकडून श्रेणीच्या उल्लेखासह प्रशस्तीपत्र दिले जाते . यामध्ये १० वर्षापासून ते ८०+ वयाचे कोणीही भाग घेऊन गीतेची ओळख सोप्या भाषेत ( मराठी , हिंदी , इंग्रजी ) करून घेतात . हि स्पर्धा सन २०२२-२३ मध्ये नागपूर , वर्धा , अमरावती , माहूर , हिवरे , जालना , छत्रपती संभाजीनगर , नाशिक , ठाणे , भांडुप, कल्याण , बदलापूर , डोंबिवली , विरार , आगाशी , पनवेल इत्यादी ठिकाणी महाराष्ट्रात घेतली आहे . यापुढे महाराष्ट्राबाहेर मध्य प्रदेश , गुजरात वगैरे राज्यांमध्येही संपर्क झाला आहे . तिथे जाऊन ही स्पर्धा घेण्याचा श्रीगुरुकुलम् न्यासाचा मानस आहे . आतापर्यंत या माध्यमातून २००० पेक्षा अधिक व्यक्तींना गीतेविषयी जिज्ञासा जागृत करण्यात न्यास यशस्वी झाला आहे .


(2) स्वातंत्र्यवीरांप्रती कृतज्ञतापूर्वक गीता पाठयज्ञ :-
श्रीगुरुकुलम् न्यासाचा हा अत्यंत अभिनव उपक्रम आहे . यामध्ये न्यासाचे १५० ते २०० कार्यकर्ते छात्र स्वखर्चाने आपले योगदान देत आहेत . यामध्ये संपूर्ण गीतापठण ( वाचन ) केले जाते . आतापर्यंत भगूर , चिरनेर , चिंचवड , शिरढोण , काळाराम मंदिर नाशिक , गणपती मंदिर डोंबिवली , अशा विविध ठिकाणी न्यासाने हे कार्यक्रम संपन्न केले आहेत .आता अयोध्या कारसेवकपुरम् अर्थात रामलला मंदिर,आणि पश्चिम बंगालमधील कोलकता जवळ चंदननगर क्रांतिकारी कार्याचे प्रारंभस्थान तसेच बीड येथील जनीजनार्दन संस्थान ,वाराणसी ज्ञानवापी परिसर, सोमनाथ मंदिर ,सौराष्ट्र,….अन्य अनेक ठिकाणी पाठयज्ञ संपन्न करण्याविषयी प्रयत्न आहेत.

(3) शालेय प्रकल्प :-
भावी पिढीप्रति योगदान रुजू करण्याच्या दृष्टीने विविध शाळांमध्ये भगवद्गीता स्पष्ट , शुद्ध उच्चारांसह शिकवणे , स्मरणशक्ती विकास , आत्मविश्वास वाढवणे , विचारांचा नेमकेपणा विद्यार्थ्यांमध्ये यावा , यासाठी या माध्यमातून न्यासाचे शिक्षक वैविध्यपूर्ण आयामांमार्फत कार्य करीत आहेत . या शाळा शक्यतो ग्रामीण भागाशी जोडलेल्या असाव्यात असा प्रयत्न आहे . डे-केअर सेंटरमधील ३ते ८ वर्षापर्यंतच्या छोट्या मुलांसाठीदेखील आपले शिक्षक अशा प्रकारचे काम रुजू करतात .


(4) संथा वर्ग कंठस्थ व सखोल अभ्यासक्रम :-
या आयामांद्वारे गीतेतील श्लोकांचे शुद्ध उच्चारण तसेच गीतेतील पंचसूत्रीचा मागोवा घेणारे अर्थपूर्ण विवेचन ,प्रत्यक्ष गुरुकुल पद्धतीने वर्ग घेऊन केले जाते . संपूर्ण गीता पाठ करणाऱ्यांना शृंगेरी पीठाधीश श्री शंकराचार्यांचे आशीर्वाद व प्रोत्साहन पुरस्कार प्राप्त व्हावा म्हणून तयारी घेऊन शृंगेरी येथे पाठवले जाते . आतापर्यंत न्यासामार्फत ऐंशीहून अधिक छात्र असे सुयश व समाधान मिळवून आले आहेत . न्यासाच्या कार्यात प्रत्यक्ष योगदान देत आहेत . तसेच इतरांसाठी प्रेरणास्रोत ठरत आहेत . यामध्ये वय वर्ष ७ ते ७५ पर्यंतचे छात्र सहभागी आहेत . सुबोध गीतासार हा त्रिस्तरीय सखोल अभ्यासक्रम श्रीगुरुकुलम् न्यासाने तयार करून प्रत्यक्ष कार्यवाहीत आणला आहे.
**प्रथम स्तर -संपूर्ण भगवद् गीता वस्तुनिष्ठ प्रश्न,
**द्वितीय स्तर – भगवद्गीता ,उपनिषदे संस्कृत व्याकरण ,
** तृतीय स्तर – अनुषंगिक अभ्यास चिंतन , मनन करुन तौलनिक लेखी प्रश्न व प्रत्यक्ष सादरीकरण.
यामध्ये १५० हून अधिक छात्र अभ्यास करीत आहेत तर 120 हून अधिक छात्रांनी प्रथम स्तर अभ्यासक्रम पूर्ण केला आहे .


(5) पंचगव्याधारित उत्पादनांसाठी प्रशिक्षण वर्ग :-
ग्रामीण सुदूर क्षेत्रातील व्यक्तीही न्यासाशी संपर्कात याव्यात या दृष्टीने न्यासाने आपल्या चार कार्यकर्त्यांना वर्धा येथे एमगिरी मार्फत आयोजित प्रशिक्षणासाठी पाठवले होते . हे प्रशिक्षण केंद्र सरकारच्या एम.एस.एम.ई. योजनेचा भाग आहे. त्यामुळे या चार प्रशिक्षकांना केंद्र सरकार व एमगिरीतर्फे प्रशस्तीपत्र व प्रशिक्षण देण्याचे अधिकार प्राप्त झाले आहेत.
सटाणा तालुक्यातील आसखेडा गाव , सिन्नर तालुक्यातील निमगाव देवपूर, मुरबाड जवळ रायता येथे प्रशिक्षण शिबिरे ग्रामस्थांसाठी निश्चित करण्याविषयी प्राथमिक संपर्क झाला आहे.
यानिमित्ताने प्रशिक्षणार्थींना भगवद्गीता संस्कार देता येईल व आत्मनिर्भर व्हावे म्हणून साहाय्य हा उद्देश.


(6) संपूर्ण योगाभ्यासातून सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास :-
सर्टिफिकेट कोर्स; डिप्लोमा कोर्स ; डिग्री कोर्स , अशा स्तरांसाठी अभ्यासक्रम आखणी पूर्णत्वाकडे येत आहे. त्यासाठी आवश्यक प्रशिक्षक श्रीगुरुकुलम् न्यासाकडे आहेत. सध्या न्यासाच्या शिक्षकांकडून प्रशिक्षित छात्र राष्ट्रीय स्तरावर योग स्पर्धेमध्ये सुयश मिळवीत आहेत. भगवद्गीतेमधील योगाभ्यास समजून घेत आहेत.

 

श्रीगुरुकुलम् न्यासाची विशेष उपलब्धी
अंध (दिव्यांग) विद्यार्थ्यांचे विकसन होऊन त्यांना स्वप्रतिष्ठा प्राप्त व्हावी यासाठी भगवद्गीतेच्या माध्यमातून न्यासाचे शिक्षक प्रयत्नशील आहेत. ब्रेल लिपी लिहिण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी न्यासाच्या छात्रा शिक्षण घेत आहेत. जय योगेश्वर.
‘अनंत आमुची ध्येयासक्ती – अनंत अन् आशा…’
अविरत विस्तार हेच ध्येय… भारतीय सनातन संस्कृतीच्या अधिष्ठानामार्फत समाजविकास …‘
कृण्वन्तो विश्वम् आर्यम् !!’
***न्यासाच्या प्रचार प्रसार कार्याचे प्रत्यक्ष प्रमाण आपल्याला मिळावे तसेच जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी श्रीगुरुकुलम् न्यासाने मराठी तसेच हिंदीतून ‘गीतागुंजन आणि पैरवी भगवद्गीतेची’ या कार्यक्रमाद्वारे युट्यूब वाहिनीचाही शुभारंभ केला आहे. आपण अवश्य या श्रीगुरुकुलम् न्यास वाहिनीला भेट देऊ शकता.
या चॅनल वर ,गीतेतील श्लोकांचे शिक्षकांच्या आवाजात शास्त्रशुद्ध उच्चारण व आजच्या जीवनशैलीशी निगडित श्लोकांचे महत्व व संबंधित प्रश्नांची उत्तरे. याचे विवेचन ,न्यासाच्या अध्यक्षा मंजिरीताईंकडून ऐकायला मिळेल. आपणही आपले प्रश्न विचारुन यामध्ये सहभाग नोंदवू शकता.
चित्रप्रदर्शनी श्रीगुरुकुलम् न्यासाने आपल्या छात्रांच्या मदतीने, भगवद्गीतेतील अठरा अध्यायातील महत्वाच्या श्लोकांवर आधारित चित्रप्रदर्शनी तयार केली आहे. विविध विद्यालये व अन्य आस्थापनांमध्ये ही प्रदर्शनी घेऊन जाण्यास सुरुवात झाली आहे.
संपूर्ण गीता कंठस्थ स्पर्धा.
न्यासातर्फे प्रतिवर्षी एप्रिल महिन्यात शेवटच्या आठवड्यात सर्वांसाठी खुली निःशुल्क असणारी खुली कंठस्थ स्पर्धा घेतली जाणार आहे. स्पर्धा पूर्ण करणाऱ्यांना प्रमाणपत्र व पारितोषिक असेल.
शिवाय क्रमांक मिळवणाऱ्यांना वेगळी बक्षिसे असतील.
यावर्षी स्पर्धेत भाग घेऊ इच्छित असतील त्यांनी या साईटवर उपलब्ध असणारे प्रवेशपत्र भरुन ऑनलाईन सबमिट करायचे आहे. त्यांना परीक्षेच्या तारखा व वेळ तसेच नेमके ठिकाण याविषयी मुदत संपल्यावर कळवले जाईल. फॉर्म भरण्याची 28 फेब्रुवारी 2024 ही अंतिम तारीख यावर्षी आहे.
आणखी एका अभिनव उपक्रमाची तयारी श्रीगुरुकुलम् न्यास करीत आहे. लवकरच त्याविषयी माहिती दिली जाईल.
अवश्य या साईटला भेट देत रहा..